दारू घोटाळा: अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात घेतली धाव, ED च्या अटकेला दिले आव्हान!

Arvind kejriwal news

समाचार इन: सध्या दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्या अटकेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) द्वारे त्यांना अटक करण्यात आली असून या अटकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. आम आदमी पार्टीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कायदेशीर टीम रविवारी शक्य असल्यास या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करणार आहे.

कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी केजरीवाल यांना विस्तृत आणि निरंतर चौकशीसाठी 28 मार्च पर्यंत इडी कोठडीत दाखल केले होते. केजरीवाल यांनी त्यांच्या याचिकेत युक्तिवाद केला की, त्यांना अटक करणे हे बेकायदेशीर असून ताबडतोब कोठडीतून बाहेर येण्यास ते पात्र आहेत. केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली होती.

केजरीवाल यांना दंडात्मक कारवाई पासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर काही तासांमध्येच ईडीने त्यांना अटक केली होती. केजरीवाल यांनी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्स सह सर्व कार्यवाही रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हे प्रकरण 2021-22 साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण तयार करणे आणि त्या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. हे धोरण नंतर रद्द करण्यात आले. या प्रकरणी आप चे प्रमुख नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email