साहित्य अकादमीचा वार्षिक महोत्सव ‘साहित्योत्सव 2024’ नवी दिल्ली येथील रवींद्र भवन येथे असलेल्या साहित्य अकादमीच्या आवारात साजरा झाला. 12 मार्च रोजी साहित्य अकादमीचा स्थापना दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात.
समाचार इन: गेल्या वर्षी 20 डिसेंबर रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी 2023 या वर्षासाठी 24 भारतीय भाषांमध्ये पुरस्कारासाठी निवडलेल्या कलाकृती आणि साहित्यिकांची नावे जाहीर केली होती. साहित्य अकादमीने काल आपले वार्षिक पुरस्कार प्रदान केले. नवी दिल्लीतील कमानी सभागृहात आयोजित एका भव्य समारंभात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आले.
हिंदी कादंबरीकार संजीव आणि इंग्रजी लेखिका नीलम शरण गौड यांच्यासह 24 लेखकांना मंगळवारी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमीच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘साहित्योत्सव’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. साहित्य अकादमी पुरस्कार ज्या कलाकृतींना देण्यात आला त्यामध्ये कवितेची नऊ पुस्तके आहेत तर सहा कादंबऱ्यांसह पाच लघुकथांच्या पुस्तकांचा देखील यात समावेश आहे.
सुप्रसिद्ध लेखक संजीव यांना त्यांची कादंबरी ‘मुझे पहचानो’ आणि नीलम शरण गौड यांना कादंबरी ‘रेक्यूम इन रागा जानकी’ साठी सन्मानित करण्यात आले. उर्दू मधील सादिका नवाब सहर यांना त्यांच्या ‘राजदेव की अमराई’ या पुस्तकासाठी पुरस्कृत करण्यात आले. यासोबतच ज्या लेखकांना गौरवीत करण्यात आले आहे, त्यामध्ये विजय वर्मा (डोगरी), विनोद जोशी (गुजराती), मंशुर बनिहाली (काश्मिरी), एस गंभिनी (मणिपुरी), आशुतोष परीडा (उडिया), गजेसिंह राजपुरोहित (राजस्थानी), अरुण रंजन मिश्र (संस्कृत), विनोद आसुदानी (सिंधी) यांचा समावेश आहे.
यासोबतच मराठीचे सुप्रसिद्ध कादंबरीकर कृष्णात खोत, स्वपनमय चक्रवर्ती (बांग्ला), राजशेखरन (तामिळ), प्रणवज्योती डेका (असमिया), नंदेश्वर दैमारी (बोडो), प्रकाश एस. पर्येंकार (कोंकणी), टी. पतंजली शास्त्री (तेलुगु) आणि तारासिन बासकी (संथाली) यांना देखील प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार समारंभाला संबोधित करताना प्रख्यात लेखिका प्रतिभा राय यांनी सांगितले की, ‘भाषाच्या प्रगती विना कोणतीही संस्कृती अधिक काळापर्यंत जिवंत राहू शकत नाही.’
त्या म्हणाल्या, ‘साहित्य अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना जोडून ठेवते आणि कधीच विभाजन करत नाही. लेखन नेहमीच सार्वभौमिक असते आणि बदलत्या काळानुरुप देखील ते आपली चमक सोडत नाही.’ या कार्यक्रमांमध्ये साहित्य अकादमी चे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के श्रीनिवासराव देखील उपस्थित होते.