समाचार इन: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संवाद यात्रेच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत. गुरुवार (ता.१४) ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी मराठा समाजाला संबोधित कारणार आहेत. दरम्यान बीडमधील कैज येथे त्यांची संवाद यात्रा संपन्न झाली असून त्यांनी यावेळी उपस्थित हजारो मराठा बांधवांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही असे स्पष्ट केले. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत मराठा बांधवांची फसवणूक केल्याबद्दल जाब विचारला. एकीकडे सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढून करोडो मराठे मुंबईतून परत पाठवायचे आणि नंतर ती अंमलबजावणी न करता १० टक्के आरक्षण देऊन खेळ खेळायचा हे सहन केले जाणार नाही. आम्ही मराठे ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. १० टक्के आरक्षणाची खेळी खेळत मराठा बांधवांनी गुलाल उधळला तर ठीक नाहीतर जरांगे पाटीलवर एसआयटी लावा असा डाव रचण्यात आला होता. पण मी एसआयटी ला घाबरत नाही, जर घाबरलो असतो तर मी आधीच छत्रपती संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, हे ऐकल्यावर मी इतर नेत्यांप्रमाणे आजारी पडण्याचे ढोंग केले असते. पण मी डॉक्टरला लगेच म्हणालो मी ठणठणीत बरा झालोय, मला दवाखान्यातून सुट्टी द्या. मी प्रामाणिक आहे त्यामुळे मला या गोष्टींचा फरक पडत नाही असे प्रखर मत जरांगे पाटील यांनी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत टाकले. तसेच उपस्थितांना त्यांनी आवाहन केले की, मराठ्यांनो डोळ्यासमोर आपली लेकरं ठेवा राजकारणी नाही.
तसेच ते पुढे म्हणाले, हे दहा टक्के आरक्षण मूळ मराठ्यांची मागणी नाहीच, हे आरक्षण फक्त राज्यापुरतं मर्यादित आहे आणि हे १००-२०० लोकांसाठीच फायदेशीर आहे. जे ओबीसीतून आरक्षण आपण मागतोय ते राज्यापासून केंद्रापर्यंत लागू आहे. त्यामुळे ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याने माझ्या गोरगरीब मराठ्यांची मुलं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहेत असे मत त्यांनी मांडले.
विशेष म्हणजे मराठा हा पूर्वीपासून आरक्षणात आहे, हे सिद्ध झाल्याकारणाने मराठ्यांनी ही मागणी लावून धरली आहे. परंतु सरकारने दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर मराठा शांत बसतो का? हा एक डाव टाकून बघितला. त्यांचं स्वप्न होतं २०१८ साली जेव्हा मराठ्यांना १३ टक्के आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी गुलाल उधळला, तेच चित्र यावेळीही बघायला मिळेल, परंतु त्यांचे स्वप्न सत्यात उतरले नाही, कारण मराठ्यांनी गुलाल कुठे उधळलाच नाही आणि उधळणार कसा, आमची मागणी ओबीसी मधून आरक्षण मिळावे ही आहे आणि जो सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही आहे. आत्ताचे जे आरक्षण दिलं ते बिनबुडाचे आहे, त्यात ओबीसी मधील कुठल्या सुविधा लागू होत नाहीत, हे पोकळ आरक्षण आम्हाला नकोय असे मत यावेळी जरांगे पाटलांनी मांडले.
ते पुढे म्हणाले, या १० टक्के आरक्षणामध्ये मराठ्यांचा फायदा नाही, ज्यामध्ये ओबीसींना लागू असणाऱ्या सुविधा नाहीत ते आरक्षण दिलच कशाला? हा प्रश्न जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला. तसेच जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावी लागते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाज हा मागास सिद्ध झालाय, मग मराठा समाज जर मागास सिद्ध झाला असेल तर त्याला ५०% च्या आत आरक्षण का नाही? नियमाप्रमाणे २७ टक्के ओबीसी आरक्षणात मराठ्यांना आरक्षण देणे बंधनकारक आहे, ती अंमलबजावणी का करण्यात आली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत हे १० टक्के आरक्षण ५० टक्के च्या वरती देऊन त्याचा वेगळा प्रवर्ग केला आहे आणि ते टिकणार नाही हे अंतिम सत्य आहे असे स्पष्ट करून आमची पुन्हा २०१८ ला झाली तशी फसवणूक करण्यात आली आहे, त्यामुळे हे आरक्षण आम्हाला मान्य नाही असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.