समाचार इन: आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी प्रथमतः त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हानगर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे आणि कर्डिले यांनी स्वागत केले.
यांनतर पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांच्यासह पाथर्डी शहरात भेट दिली. यावेळी पाथर्डीतील ग्रामस्थांच्या वतीने पंकजा मुंडेंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून सुजय विखे आणि पंकजा मुंडेंना एकप्रकारे भरभरून प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे नगर दक्षिणचे राजकीय वातावरण सध्या विखे कुटुंबीयांकडे झुकताना दिसत आहे.
दुसरीकडे निलेश लंकेंनी देखील कंबर कसली असून त्यांच्याही भेटी-गाठी सुरू आहेत. जोरदार प्रचार दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहे. एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वार पलटवार करत नगरचे राजकीय वातावरण चांगलेच लोकसभेच्या अनुषंगाने जोर धरू लागले आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथेही भेट देऊन मोहोटादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व जनतेची संवाद संवाद साधून डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मत मांडून लोकांचे त्यांच्यावरील असलेले प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट केले. तसेच सुजय विखे यांनी देखील जनतेशी संवाद साधून मागील कार्यकाळात केलेल्या कामांची आणि पुढील काळात केल्या जाणाऱ्या कामांबाबत भाष्य केले. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.