पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी ०२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आपल्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नमो रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. असे म्हटले जात आहे की, १९९९ साली शरद पवार यांच्यामार्फत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनाच्या आणि पुतणे अजित पवार यांच्यासोबतचे असलेले तणावपूर्वक संबंधांच्या पार्श्वभूमीवर सदरील निमंत्रण देण्यात आले आहे.
अजित पवार हे काका शरद पवारांपासून वेगळे होत शिवसेना-भाजपासोबत हातमिळवणी करत महायुतीमध्ये समाविष्ट झाले आहेत. मागच्या वर्षी जुलै मध्ये शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेत आले होते. याबाबत अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा सुरु होती, अखेरीस या सत्ता संघर्षात त्यांनी देखील उडी घेतली आणि पक्ष फोडत महायुतीत सहभागी झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही मिळाले आहेत. आता अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याच्या विचारात आहेत. सध्या या लोकसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना दिलेल्या निमंत्रणाबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले की, खासदार या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना बारामतीतील अधिकृत कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने त्यांना शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना आनंद होईल. तसेच गोविंदबाग येथे चहापानासाठी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला तर आनंद होईल असे देखील त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करतील का? हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.