भारतीय फुटबॉलचे हिरो सुनील छेत्री ने निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सदरील माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नुकतीच दिली आहे.
समाचार इन: भारतीय फुटबॉल संघाचे कप्तान आणि फुटबॉलचे हिरो सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांनी निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. ते आपल्या करिअरची अखेरची मॅच सहा जूनला कुवैत विरुद्ध विश्वकप ‘क्वालिफाईंग मॅच’च्या दरम्यान खेळणार आहेत. त्यांनी आपल्या एक्स हॅण्डल वर एक व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. 39 वर्षीय सुनील छेत्री यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये केली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी आपल्या देशाचे नाव अनेक ठिकाणी उंचावले आहे. छेत्री यांनी एका भावनिक पोस्टद्वारे सांगितले की, सहा जून रोजी विश्व कप च्या ‘क्वालिफाईंग मॅच’ नंतर ते निवृत्ती घेणार आहेत. त्यांचे फुटबॉल मधील करिअर तब्बल 19 वर्षाचे राहिले आहे.
कॅप्टन फँटॅस्टिक म्हणून आहे ओळख
सुनील छेत्री यांना फुटबॉलच्या विश्वात ‘कॅप्टन फँटॅस्टिक’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये रोनाल्डो आणि मेसी नंतर सर्वाधिक गोल केले आहेत. 2002 मध्ये ते पहिल्यांदा मोहन बगान साठी खेळले. देशासाठी त्यांनी आतापर्यंत 94 गोल केले असून 150 सामने खेळले आहेत.
खूपच भावनिक झाले सुनील छेत्री
सुनील छेत्रीने आपल्या व्हिडिओत सांगितले की, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, ज्या क्षणी मी आपल्या देशाची जर्सी परिधान केली होती. मी तो सामना कधीच विसरू शकत नाही, जेव्हा मी देशासाठी पहिल्यांदा गोल केला. सुखी सरांनी मला सांगितले होते की मी देशासाठी खेळत आहे, मला हे विसरून चालणार नाही. देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद क्षण होता. माझ्यासाठी फुटबॉल सोडणे इतके सहज सोपे नाही. आपले कोच, आपले ग्राउंड, प्रेशर गेमला सोडणं फार कठीण आहे. मी सर्वात आधी यासाठी स्वतःला तयार केले. हो, आता मी माझ्या खेळाला निरोप देत आहे. त्यानंतर मी माझ्या आई वडील आणि पत्नीला सांगितले. माझा निर्णय ऐकून तर माझ्या पत्नीला रडूच कोसळले. ती हे मानायला तयारच होत नव्हती की, मी आता देशासाठी खेळणार नाही. मी सौभाग्यशाली आहे की, इतके वर्ष मी देशासाठी खेळलो आणि देशाची सेवा केली. मी प्रत्येक क्षण हा मजेशीर घालवला आहे. या खेळात प्रेशर आहे, परंतु मी नेहमीच त्याकडे सकारात्मक बघितले आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. मला माझ्या चाहत्यांकडून जे प्रेम मिळाले ते अतिशय बहुमूल्य आहे आणि तीच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाची संपत्ती आहे. सुनील छेत्री ने आपल्या व्हिडिओची सुरुवात मला काहीतरी सांगायचे आहे अशा आशयाने केली आणि शेवट करताना सांगितले की, जूनमध्ये ते आपल्या करिअरचा शेवटचा सामना खेळणार आहेत. शेवटी त्यांनी सांगितले की, आशा आहे हा सामना विलक्षण ठरेल. या सामन्यासह मी देखील निवृत्ती घेईल.