पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आणि पक्षात अजित पवार व शरद पवार दोन गट पडले. यापैकी घड्याळाचे चिन्ह आणि नाव यावर देखील अजित पवारांनी दावा करत ते आपल्याकडे खेचून आणले. तर दुसरीकडे शरद पवारांनी संयमाची भूमिका घेत दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठरविले. या अनुषंगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी शरद पवार असे नाव देण्यात आले तर तुतारी या चिन्हावर हा गट निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवारांनी बंड का केले? याबाबत केवळ बारामतीत नाही संपूर्ण देशात चर्चांना उधाण मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर आता एक निनावी पत्र समोर आले असून या पत्रात करण्यात आलेल्या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या निनावी पत्रामुळे पवार कुटुंबियातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून अजित पवारांनी बंड का केले? पवार कुटुंबीयांमध्ये फूट पाडण्याचे नेमके कारण काय? अशा प्रश्नांचे निरसन या पत्राद्वारे होताना दिसत आहे. या पत्रात मोठा दावा करण्यात आला आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने सदरील पत्र हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या पत्राच्या सत्यतेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ कि रोहित अशी निवड करण्याची वेळ आली तेव्हा अप्पासाहेबांच्या थेट वारसदार म्हणून रोहित पवार यांची निवड करत अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. या निवडीमुळेच पवार कुटुंबीयांतले अंतर वाढले आणि अजित पवारांनी बंड केले असा काहीसा अर्थ या पत्रातून वाचकांच्या ध्यानी उतरत आहे.
या पत्राच्या शेवटी ‘वाजवा तुतारी गाडा गद्दारी..’ अशी एक ओळ देखील देण्यात आली आहे. रोहित पवारांची निवड आणि सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी झालेली निवड हे अजित पवारांच्या बंडाचे कारण असल्याचे सूर आता या पत्रानंतर बाहेर येऊ लागले आहेत. रोहित पवारांची निवड तिथपासून खरा जळफळाट सुरु झाला आणि सुप्रिया सुळेंच्या निवडीनंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, वाजवा तुतारी गाडा गद्दारी..’ असे या पत्रातून सांगण्यात आले आहे.